20240418 Phan-Rang (पांडुरंग) - Hindu Temple, Vietnam - 2

 Thu 18 Apr 2024 | Vietnam National Day | World Heritage Day 
  
व्हिएतनामच्या निन्‌-थुआन या प्रांतात फ़ान्‌-रांग हे शहर आहे. फ़ान्‌-रांग म्हणजे पांडुरंग. तिथे जाण्याचा चांगला योग काल जुळून आला. 
 
काही शे वर्षे या देशात (यासह इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया व चीन यांचे काही भाग - येथे) भारतीय चोळ वंशीय राजांचे राज्य होते. त्यांनी आपल्यासोबत इथे हिंदूधर्म आणला, रुजवला - तो बहरला - तो आजतागायत इथे आहे. इथे भारतीय राजांची सत्ता ही रक्ताचा थेंबही न सांडता नांदू लागली त्यामुळे त्याची दखल तशी इतिहासात घेतली गेली नाही. शेवटी एका बाजूने चिन्यांच्या व दुसरीकडून फ़्रेंचांच्या आक्रमणापुढे ते राज्य हतप्रभ झाले.  

गुगल मॅप्स ~ https://bit.ly/PhanRang_area 
 
या भारतीय राज्याला चंपा असे नाव होते. त्या चंपा राज्याचे हिंदू रहिवासी आजही स्वतःला चाम्‌ असे म्हणवून घेतात. व्हिएतनाम सरकारने या चाम ‘वंशीय’ लोकांसाठी खास संरक्षक भाग म्हणून हे फ़ान्‌-रांग शहर योजून दिले आहे. इथले सुंदर मंदीर बांधणारा व शहर वसवणारा राजा स्वतःस पांडुरंग म्हणवून घेई, म्हणून या शहराचे नाव पांड्रांग - वा फ़ान्‌-रांग. 
 
आपण इथे आलो की हे चाम लोक वेगळे कळून येतात. ते आपणां भारतीयांशी अगदी आपलेपणाने बोलायला येतात. काल मी एका चाम वंशीय कुटुंबाला भेटलो - त्याबद्दल पुढे येईलच. माझ्या सहकाऱ्याला मी सामान्य व्हिएतनामी आणि चाम्‌ स्थापत्यामधला एक फ़रक तिथल्या तिथे सांगितला. तो म्हणजे या चाम्‌ वसाहतींतली घरे चारही बाजूंनी उघडी असतात. चारही दिशांनी हवा खेळती राहावी म्हणून दोन समोरासमोरच्या बाजूंना किमान खिडक्या तरी असतातच. हे सर्वसामान्य भारतीय स्थापत्य आहे. याउलट व्हिएतमामी घरे फ़क्त समोरून व मागून उघडी असतात व उजव्या डाव्या भिंतींना खिडक्याच काय पण गवाक्षेही अभावानेच असतात. 
 
माझा सहकारी कान्ह (Khanh), त्याची बायको ङोक्‌ (Ngoc - वाङ्मय मधला "ङ"), त्यांच्या दोन शाळकरी मुली आणि बायकोची बहीण चँग्‌ (Trang) यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीला ही एका दिवसाची ट्रिप ठरवली आणि मला येतोस का म्हणून विचारले. आपण अर्ध्या पायावर तयार हे त्यांनाही माहितीच होते. पण या निमित्ताने एका व्हिएतनामी कुटुंबाचाही अनुभव घेता येत आहे म्हटल्यावर माझी उत्सुकता आणखी जास्त होती. सूनबाईंचे व आईंचे अजिबात पटत नाही पण बाबांशी मात्र चांगले जमते इतपत श्टोऱ्या माझ्या कानावर अगोदरच आलेल्या होत्या. शेवटी काय, घरोघरी ...! माणूस इथून तिथून सारखाच. 
 
आमच्या शहरापासून साधारण नव्वद किमीचा हा रस्ता अतिशय सुंदर, रम्य असा आहे. पैकी निळ्याश्शार समुद्राच्या बाजूबाजूने डोंगरातून जाणारे वळणदार रस्ते लागले की माझ्या जिवाला अशी चुटपुट लागते की - हायला या रस्त्यावर तर एकटे बुलेटवर यायला पाहिजे. बुलेट जरी नाही तरी काहीतरी जुगाड करायलाच पाहिजे. बघू लवकरच काहीतरी. 
 
वाटेत नारळपाणी प्यायला थांबलो. व्हिएतनामचे नारळपाणी आपणां भारतीयांचा नारळपाण्याबद्दलचा सगळा अभिमान एक ठेवून दिल्याप्रमाणे खटक्यात खाली आणते. नारळाच्या आत जणू लिंबूसरबत टाकलेले असावे इतके ग्गोड नारळपाणी इथल्या सगळ्या नारळांतून निघते. एक आंबा सोडला तर यांची सगळीच फ़ळे भारतात किरकोळ बाजारात मिळणाऱ्या फ़ळांपेक्षा नक्कीच उजवी असतात हे मान्य करायला हवे. 
 
त्यानंतर समुद्र किनाऱ्यावरचे एक टिपिकल टुरिष्टिक स्थान - आणि एक टुरिष्टिक पॅगोडा यांच्या भेटी झाल्या. हे बुद्धमंदीर पर्यटकांचे जरी असले तरी सर्वच बुद्धमंदीरांप्रमाणे ते जरा डोंगरावर असल्याने तिकडे गेल्यावर दर्शनमात्रे मनकामनापूर्तीचा अनुभव आला. आग्नेय आशियामधे सर्वत्र एकेका शहराच्या मुख्य बुद्धमंदीराची योजना एका डोंगरावर असते. आणि त्या डोंगरावरून हे बुद्ध महाराज आपला आशीर्वाद सबंध शहरावर प्रसारित करीत असतात - ही संकल्पनाच अतिशय नयनरम्य आणि मनोरम्य आहे. 
 
सूपी नूडल्स - अर्थात "प्फ़ऽ" (Pho) सोबतचे साधे जेवण घेतल्यावर मुख्य जागी जायचे होते - ते म्हणजे तिथले हिंदू मंदीर - Thap Cham अथवा Po Klong Garai Temple. त्याआधी एका पॉटरी केंद्रात घेऊन जाण्याचा बूट निघाला. बायकांचा तिथे शॉपिंग हा मेन पॉइंट असल्याने मी जरा नाखुषीनेच गेलो खरा - पण त्या पूर्ण कलाकृतींवर सगळा भारतीय प्रभाव बघून आश्चर्य आणि आनंद हे दोन्ही मनात दाटून आले. सगळीकडे मंदीरांच्या प्रतिकृती, गणपतीच्या, बुद्धाच्या मूर्ती, आणखी देव - यक्ष - गंधर्व सगळेच वेगवेगळ्या मुद्रांमधे पाहून जामच मजा आली. तेवढ्यात डोक्यात प्रकाश पडला, "अरे यांना विचारा अन्न शिजवण्याची मातीची भांडी आहेत का?" 
 
मग तशी दोन भांडी निवडून कुठलीही घासाघीस न करता त्यांचे पैसे देईस्तोवर त्या दुकानाच्या मालकाशी चांगली ओळख झाली. तो चाम्‌ होता. रंगाने आपल्यासारखा सावळा. त्याचे इंग्लिश उच्चारण आमच्या व्हिएत सहकाऱ्यांपेक्षा स्पष्ट होते. "Yes, because years ago our mother tongue was Sanskrit" हे त्याने मला सहज स्पष्टीकरण दिले. मी भारतीय म्हटल्यावर तिथेच मागे भांडी घडवत बसलेली त्याची आई मला अगदी प्रेमाने येऊन भेटली. त्याच्या दोन मुलीही इकडे तिकडे करीत होत्या. अगदी छान भारतीय सौंदर्य. चाम्‌ लोकांचे पेहराव व चेहरेपट्टी या गोष्टी व्हिएतनामी लोकांपेक्षा वेगळ्या आहेत. 
 
पुढे एका टेकडीवर जवळपास पंधराशे वर्षांपूर्वी उभारलेले हे हिंदू मंदीर पहायला गेलो. लाल विटांच्या बांधकामात घडवलेली ही सर्व व्हिएतनामी हिंदू मंदीरे प्रथमदर्शनीच आपल्या हृदयात काही तरंग निर्माण करतात. या सगळ्या वैभवसंपन्न हिंदू वारश्याचे आपण काही अंशी अधिकारी आहोत - वाहक आहोत आणि आपल्या हातून तसे घडत मात्र काहीच नाही ही बोच कुठेतरी जाणवते. गेली अनेक दशके व्हिएतनामचा हा इतिहास भारतीय राज्यकर्त्यांना माहिती नव्हता असे नाही. पण तो भारतीय संस्कृतीचा "हिंदू" विश्वसंचार असल्याने त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले गेले म्हणायला वाव आहे. गेल्या काही वर्षांत भारत सरकार व्हिएतनाम सरकार सोबत या मंदीरांवर, या वारश्यावर काम करीत आहेत. किमान चार पाच ठिकाणी पैशांची विशेष तरतूद करून आपले पुरातत्व विशेषज्ञ तिथे राहून काम करीत आहेत. 
 
या मंदीरांत एकाच इमारतीत गर्भगृह आहे. तिथे शंकराची पिंडी आहे आणि गोव्याच्या मंगेशासारखा दाढीवाला शंकरबाप्पा उभ्या जगाचे हलाहल पचवीत तिथे शांत बसलेला आहे. समोरच त्याच्याकडे एकटक पहात बसलेला नंदी आहे. या नंदीच्या डोळ्यांतले भाव थेट काशीविश्वेश्वराच्या नंदीच्या डोळ्यांप्रमाणेच वाटतात - कशाची तरी आर्ततेने वाट बघणारे. तिकडे उभा राहून हात जोडल्या अवस्थेत मी म्हणालो, "बाबा मिल गये हैं". माझा सहकारी म्हणे, "why u say baba". मी म्हटले, "baba means father". त्यावर त्याची बायको लगेच म्हणाली, "our city has Ponagar temple. there is mother. and here is father"! शेवटी काय - माणूस इथून तिथून सारखाच. 
 
खरोखरच, आमच्या Nha Trang शहरात एक यापेक्षा मोठे हिंदू मंदीर आहे ... आणि तिथे महिषासुरमर्दिनी आहे. त्यावरची वेगळी पोस्ट करीत आहे. फ़ेसबुकावर या ठिकाणी ती प्रकाशित आहे. 
 
तर एकंदरीत, आपल्या पूर्वजांनी दिलेला मानव संस्कृतीचा एक अनमोल ठेवा निरखता आला याचा आनंद भयंकर रणरणत्या उन्हात फ़िरूनही मनात साठवून घेत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. माझ्या मनात मात्र राहून राहून ऊर्मी येत होती, छ्या - इकडे बाइकचा कायतरी जुगाड करायलाच पायजे. या सर्व ठिकाणी मन मानेल तसे फ़िरता आले पाहिजे - एकट्याने! 



Comments

Popular posts from this blog

20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam

20241222 Sun CHUA SUOI DO pagoda with Shivam Desh

20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -