20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam
मी-सन, व्हिएतनामचे भद्रेश्वर मंदीर.
हिंदू व्हिएतनामबद्दल लिहावे तितके कमी आहे.
व्हिएतनाममधे येणाऱ्या भारतीय पर्यटकांनी चंपा साम्राज्याच्या हिंदू मंदीरांतील #ChamTemples मला ज्ञात असलेल्या साताठ ठिकाणांमधून किमान एक दोन मंदीरे तरी करावीत असे मी मागे लिहिले होते. पण परवा एका ब्रिटिश प्रवाश्याच्या पानावर हो चि मिन्ह शहराच्या नजीकच्या एकट्या मेकाँग डेल्टा मधल्या पन्नास चाम मंदीरांचे सविस्तर वर्णन वाचले आणि डोक्याला हात लावला. आमच्या न्या-चँग #NhaTrang शहरातले भव्य असे महिषासुर मर्दिनी मंदीर #Ponagar सोडले तर बाकी सर्व मंदीरे आजही दुर्गम भागांत आहेत. त्याचे उत्तर काय - तर मंदीरे शांत असावीत व मानवी वस्तीपासून लांब असावीत असा चंपा राजांचा दंडक होता.
हिंदू व्हिएतनामबद्दल लिहावे तितके कमी आहे.
व्हिएतनाममधे येणाऱ्या भारतीय पर्यटकांनी चंपा साम्राज्याच्या हिंदू मंदीरांतील #ChamTemples मला ज्ञात असलेल्या साताठ ठिकाणांमधून किमान एक दोन मंदीरे तरी करावीत असे मी मागे लिहिले होते. पण परवा एका ब्रिटिश प्रवाश्याच्या पानावर हो चि मिन्ह शहराच्या नजीकच्या एकट्या मेकाँग डेल्टा मधल्या पन्नास चाम मंदीरांचे सविस्तर वर्णन वाचले आणि डोक्याला हात लावला. आमच्या न्या-चँग #NhaTrang शहरातले भव्य असे महिषासुर मर्दिनी मंदीर #Ponagar सोडले तर बाकी सर्व मंदीरे आजही दुर्गम भागांत आहेत. त्याचे उत्तर काय - तर मंदीरे शांत असावीत व मानवी वस्तीपासून लांब असावीत असा चंपा राजांचा दंडक होता.
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या #Danang पासून जवळच "मी-सन" #MySon या ठिकाणचे श्री भद्रेश्वर शिवमंदीर व अगणित अवशेष यांचे दर्शन घेण्याचा सुवर्णयोग मी व चिरंजीव शिवम् यां दोघांसाठी गेल्या सप्तान्ताला, शनि १४ व रवि १५ डिसें २०२४ रोजी जुळून आला.
त्या क्षेत्राचे सध्या भारतीय पुरातत्व खात्यातर्फे संशोधन व विकसन केले जात आहे. त्यांतील एक शास्त्रज्ञ श्री. दानवे यांचा परिचय झाला होता. त्यांच्या मदतीने मिळालेल्या मिसेस ले या प्रवासी मार्गदर्शिकेने आम्हांला व्हिएतनामी हिंदुत्वाचा उत्तम फेरफटका घडवून आणला. मिसेस ले ही अगदी आपल्या एखाद्या लेले बाईंच्याच चेहरेपट्टीची होती म्हणायला हरकत नाही.
सन २०१७ पासून या कामात भारत सरकारने अधिक लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. पण त्याआधी जवळपास शतकाहून जास्त काळ फ्रेन्च, स्पॅनिश, इटालियन पुरातत्व संशोधकांनी व भारतीय सहकाऱ्यांनी इथे मूलभूत काम केलेले आहे. मी-सन #MySon चे हे मंदीर काॅम्प्लेक्स अगदी प्राचीन तर खरेच पण महत्वाचे तीर्थक्षेत्रही होते. सर्व अवशेषांच्या मागे पार्श्वभूमी म्हणून उभ्या असलेल्या सुंदर डोंगराचे नाव आहे म्हणे, "महापर्वत" आणि त्यातून निघून मंदीरांच्या शेजारून जाणाऱ्या नदीत "holy water" आहे!
#भारतीय_संस्कृतीचा_विश्वसंचार हा या बाजूने भारतीय व्यापारी दर्यावर्दींकडून अडीच हजार वर्षांपूर्वी सुरू झाला आणि भारतात चोळ राजवंशाच्या काळात इकडे राज्यनिर्मिती होऊन आजच्या व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका ते अगदी दक्षिण चीनपर्यन्त विस्तीर्ण व तुकड्यां तुकड्यांतले चंपा साम्राज्य #Champa_Kingdom विस्तारत गेले यावर तज्ज्ञांचे एकमत आहे. पण चाम् संस्कृतीची नेमकी उत्पत्ती कशी कशी हे अद्याप ठरलेले नाही. या विषयावर #Indianization_of_SouthEast_Asia हा युट्यूब व्हिडिओ बघण्यासारखा आहे.
चंपा राज्याचे लोक हे चाम् लोक #Cham_people म्हणून येथे ओळखले जातात. ते वर्णाने सावळे व अधिक धट्टेकट्टे आहेत. त्यांची भाषा, राहणी, कपडे, उपासना हे सर्व मुख्य प्रवाहातील हान सदृश वंशीय बौद्धांपेक्षा वेगळे आहे. त्यांना व्हिएतनाममधे संरक्षित संस्कृतीचा दर्जा आहे. ते भारतीयांना अगदी प्रेमाने भेटतात याचा एक स्वानुभव पांडुरंग #PhanRang शहराच्या भेटीच्या वृत्तांतात मागे आला आहे.
हे राज्य मंगोल, चिनी आक्रमकांशी लढले आणि पंधराव्या शतकात व्हिएतनामी सम्राट #Le_Than_Ton च्या सैन्याशी लढताना पडले. त्यानंतर हे मंदीर उपयोगातून दूर गेले. मी-सन मंदीर संकुलातले सगळ्यात जुने अवशेष दोन हजार वर्षांपूर्वीचे आहेत तर सगळ्यात अलिकडचे तेराव्या शतकातील. व्हिएतनामवरील फ्रेन्च राजवटीत सन १८८५ मधे मी-सनचा हा पुरातत्वीय खजिना एका फ्रेन्च अधिकाऱ्याला सापडला आणि आपणां भारतीयांना स्वतःची पाठ थोपटून घेण्याची सोय झाली. फ़्रेन्चांनी कालखंडांनुसार यां मंदीरांचे A-D-C-D- असे गट पाडले आणि आजही त्यांनुसार काम होते.
फार पूर्वी दगडी जोत्यांवर मोठमोठाली लाकडी मंदीरे बांधली जात. पण तो इतिहास आता पुसला गेला आहे. त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण अशा लाल मातीच्या विटांनी ही मंदीरे उभारली गेली. या सर्व विटा interlocking पद्धतीने घट्ट धरून आहेत आणि हजारो वर्ष टिकण्याएवढ्या दणकट आहेत. दोन विटांमधे जोडणीसाठी कुठलेही 'सिमेंट' वापरलेले दिसत नाही. यावर संशोधन सुरू आहे. अशा प्रकारची दगडासारखी वीट बनवायची म्हणजे त्या कामासाठी किती तांत्रिक क्षमता असावी लागेल याचा आजच्या दृष्टीकोनातून विचार करवत नाही. कच्च्या मालाची गुणवत्ता, तिचे सातत्य, त्याची चाचणी, तसा पुरवठा, प्रत्यक्ष विटा बनवण्याचे तांत्रिक कौशल्य, त्यांच्या compression साठी आवश्यक यंत्रणा, तांत्रिक मनुष्यबळ आणि घाऊक निर्मिती हे सर्व जुळवून आणणे दोन अडीच हजार वर्षांपूर्वी किती कठीण असेल? कठीण असेल का?? आणि हे सर्व दोन दोन हजार वर्षे तसेच करत राहण्यामागची प्रेरणा कुठली??
यां मंदीरांची, शिल्पांची मूळ प्रेरणा भारतीय असण्याबद्दल मनात संशय रहात नाही. पण धाटणी मात्र अनेक स्थानिक संस्कृतींच्या मिलाफ़ांतून घडलेली असल्याचे जाणवते. शिल्पांच्या चेहरेपट्टीत, परिधानांत, मंदीर इमारतींची वैशिष्ट्ये व मुख्य म्हणजे लाल विटांच्या बांधकामात हा वेगळेपणा स्पष्टपणे दिसून येतो. माझ्या पाहण्यातले विटांच्या बांधकामाचे अन्य एकमेव ठळक भारतीय उदाहरण म्हणजे जगन्नाथपुरीचे मंदीर. चाम मंदीरांमधे बहुत ठिकाणी आधी विटांचे ठोकळे बांधून काढले व मग त्याच्यावर कोरीव काम करून अप्रतिम शिल्पे घडवली गेली हे स्पष्ट समजते. काही ठिकाणी, जसे मूर्तींचे चेहरे, काही मुख्य मूर्ती, दरवाजाचे खांब, इमारतींची जोती हे घटक sand stone चे घडवलेले दिसतात.
मी-सन संकुलाचे अमेरिकन युद्धात खूप नुकसान झाले. कम्युनिस्ट क्रांतिकारी यां मंदीरांचा वापर लपण्यासाठी करीत. अमेरिकन गाढवांनी इथे माणसे मारण्यासाठी आकाशातून दिसणाऱ्या प्रत्येक गोपुरावर जमतील तसे बाँबहल्ले केले. बाँबचे खड्डे व बाँब आजही बघायला मिळतात. इथल्या एका मोठ्या जोत्यावरील अवशेषांचा एक युद्धपूर्व फ़ोटो उपलब्ध आहे. त्यावरून ही इमारत सत्तावीस मीटर उंच होती असे दिसते. आज जेमतेम पाच दहा फ़ुटांचे अवशेष आहेत.
ठीकठिकाणी अत्यंत प्रेमाने घडवलेल्या शिवपिंडी आहेत. तिथे भेट देणारे स्थानिक हिंदू व बौद्ध लोक त्यांच्या त्यांच्या परंपरेप्रमाणे त्यावर मनोभावे लाह्या, उद्बत्त्या, फ़ळे, दूध, फ़ुले इ.इ. ठेवून मनोभावे नमस्कार करताना दिसतात. आपला शंकर बाप्पा जगात कुठे कुठे जाऊन बसला आहे. काय त्याचा प्रभाव. हा विचार करताना मन भरून येते. एका ठिकाणी अत्यंत सुघड असा नंदी आणि शेजारी पुजारी अशी शिल्पे आहेत. नंदी तर अगदी बघऽत रहावा असा गोड आहे. आणि पुजाऱ्याच्या खांद्यावरील जानवेही ठळकपणे दिसत आहे. ... दोघांचीही डोकी उडवलेली आहेत. बहुदा चिनी / मंगोल गाढवांचा पराक्रम.
या वेळी हे सर्व टिपण्यासाठी मी एकटाच नव्हतो आणि आमचा शिवमही अगदी बरोब्बर कळत्या वयात माझ्या बरोबरीने माझ्याहून जास्त जिज्ञासेने हे सगळे टिपत होता हे पाहून माझ्या मनाची धन्यता - आणि प्रौढी (!) काय वर्णावी?
खरे तर हे सर्व पाल्हाळ मी लावण्याची गरज नाही. थोडे शोधल्यास इंटरनेटवर प्रचंड खजिना उपलब्ध आहे. पण आपण जाऊन आल्यावर मावंद घालण्याची आपली परंपरा आहे.
[१] https://en.wikipedia.org/wiki/M%E1%BB%B9_S%C6%A1n
Google Photos - https://photos.app.goo.gl/nLb8z21LGnTweeEG9
या विषयावरचे माझे इतर लेखन 👇🏽
यां लेबल्स मधून मिळेल.











Comments