20240505 Sunday - Nghia Son Temple, Nha Trang with Khanh [ङ्य सोन्‌ मंदीर]

मी काही धार्मिक म्हणावा असा माणूस नाही. पण समोर आलेल्या अंगाऱ्याच्या बोटाला नाही म्हणत नाही. देव आणि देऊळ यांच्या बाबतीतले निमंत्रण वा कमिटमेंट यांपैकी कशाहीसाठी आपली पावले आपोआप तिथे वळतात. 
आज साप्ताहिक नेमाप्रमाणे CoTien डोंगर चढायला निघणार एवढ्यात आमचा कान्ह बोलला, एक नवीन मंदीर आहे, येणार का? प्रथम मोठ्या तोऱ्यात नाही म्हटल्यावर विचार आला, अरे गाढवा देवाचं बोलावणं आहे, ... टाळतोस कसला?
गाडीला किक मारली नि जवळपास वीस किमीवरच्या त्या मंदीराकडे निघालो. दहाच मिनिटांत गाडी खेडेगावांच्या मधून जाऊ लागली. त्यांच्या मागे दोन्हीं बाजूला सगळी नेपथ्य रचना डोंगरांची; आणि प्रकाशयोजना मावळती पूर्वीची. मग काय विचारता?  
... फ़क्त या गाढव व्हिएतनामी लोकांना डोंगर कसणे माहिती - चढणे नाही! प्रत्येक बुद्ध मंदीराच्या मागचा डोंगर नुसता बघण्यासाठी असतो. चढण्याच्या वाटा चिणून टाकलेल्या. साम्यवादी सरकारने कुठलाही उठाव बिठाव होऊ नये म्हणून घेतलेली दक्षता वेगेरे असेल. असो. 
रस्त्यावर कॉफ़ीशॉप उघडायचे, रस्त्यावर खुर्च्या मांडायच्या आणि तासन्‌ तास निवान्त गप्पा हाणीत बसायचे हा या पूर्ण देशाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. गावांतून जाताना अगदी निवांत बसून येणारा जाणारा ट्रॉपिक बघणारे उघडे लोक पाहताना त्यांचा हेवा वाटल्यावाचून रहात नाही. 
तर आजचे हे मंदीर जरा नवीन, बऱ्यापैकी रंगरंगोटी केलेले आणि बरेच फ़ोटो ऑपची ठिकाणे तयार केलेले असे असले तरी मंदीर म्हणून येणारी शांतता, पवित्रता मात्र पुरेपुर होती. प्रत्येक मंदीरात भेटणारे चाफ़ा, पिंपळ तर होतेच, पण विविध प्रकारचे आंबे, निर फ़णस, पपई, केळी आणि असंख्य प्रकारची सुंदर फ़ुले  यांची सुंदर योजना पूर्ण आवारात केलेली होती. ती प्रत्येक मंदीरात तशीच असते. एक तळे वा हौद करून त्यात एकतर कमळे वा लोटस लिली यांचीही सुंदर लागवड केलेली असते. 
मुख्य गाभाऱ्यात शिरण्याआधीच एका झाडावर एक विलक्षण सरडे-राव भेटले - त्यांचे मुंडके फ़क्त त्यांनी मोरपंखी करून घेतले होते. बुद्धदेवाला साष्टांग नमस्कार घालून तिथेच "देवाचिए द्वारी बसा दोन मिनिटे तरी" या संतवचनाचे पालन केले. समोरच एक तलाव आणि त्यात एक आकर्षक वास्तू होती. आमच्या सहकाऱ्याला ते काय प्रकरण आहे हे माहिती नसले तरी ते पाहता क्षणीच लक्षात आले - ही आहे जपानच्या किम-काकू-जी ची नक्कल. 
फ़ोटो काढून निघायच्या आधी तिथल्या भिख्खूशी गप्पा झाल्या. भारतातून आलेला पाहुणा म्हटल्यावर त्या भावाने आतमधे जाऊन तीन गलेलठ्ठ आंबे आणि आम्हां दोघांसाठी एकेक lucky coin आणलेन. तो आशीर्वाद - प्रसाद घेऊन आम्ही तिथल्या नीरव शांततेचा निरोप घेतला. 
#Vietnam_Diary  |  #NhaTrang 




Comments

Abhimanyu said…
उत्तम.
धन्यवाद अभिमन्यू!
ब्लाॅग सुरू केल्यापासून पहिली कमेंट तुझी!

Popular posts from this blog

20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam

20241222 Sun CHUA SUOI DO pagoda with Shivam Desh

20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -