20240525 Sat CoTien 3 peaks Solo ... आणि एक कविता
डोंगर चढायचा म्हटलं की शिदोरी बांधून देताना गृहस्वामिनीचा प्रश्न ठरलेला, “काय ठेवलंय त्या डोंगरात एवढं”?
गोनीदांना कुणी विचारले,
“आप्पा, कशाला जाता या त्या शिखरावर सारखे?”
– की आप्पांनी उत्तर द्यावे –
“ते तिथे आहे म्हणून!”
आपल्याला त्यांच्यासारखी समर्पक वन लायनर जमायची नाही. पण गेल्या काही दिवसांच्या पायपिटीनंतर आज ही गवसलेली उत्तर कविता आहे.
उगा कशाला त्रास जिवाला,
कशास डोंगर चढायचा?
खालुन कुतुहल जागत राही,
अन आकर्षण उंचीचे
बाल्य जवानी आणि खुणावे,
स्मरणही केल्या मौजीचे
अता वेडपण सोसावे का,
का धोका पत्करायचा
उगा कशाला त्रास जिवाला,
कशास डोंगर चढायचा?
लावुन जिंका स्वतःस पैजा,
लढा उभारा अपुल्याशी
प्राणपणाने करून चढाई,
पोहोचा उच्च पदापाशी
श्वासही फुलतो छाती दबते,
पायही अन थरथरायचा
उगा कशाला त्रास जिवाला,
कशास डोंगर चढायचा?
अहंकार अब्रूचा येथे,
हो पाचोळा क्षणोक्षणी
तरणी मोठी आपल्याहुनही,
सरसर जाता पुढे कुणी
त्यांसगळ्यांना सलाम ठोकित,
अपुला रस्ता पहायचा
उगा कशाला त्रास जिवाला,
कशास डोंगर चढायचा?
माथ्यावर मिरवावी प्रौढी,
भरून छाती वाऱ्याने
लखलखणारा परिसर घ्यावा,
भरून नेत्रीं प्रेमाने
डोंगरमाथ्यावरती मुजरा,
महाराजांना स्मरायचा
अशास कैसा त्रास जिवाला,
म्हणून डोंगर चढायचा!
© कौंतेय देशपांडे
शनि २५ मे २०२४
नॅ चँग् , व्हिएतनाम
--- --- ---
आज सकाळी झणझणीत वांगे बटाट्याची भाजी पोळी करून खाल्ली नि दुपारी डोक्यावर उशी घेऊन झोपलो.
चार वाजता पाय आपसूक नेहमीच्या डोंगराकडे वळले.
हे फ़ोटो बघून वाटावे की किती सुंदर, किती सोपे ~ वेगेरे वेगेरे.
- - तर हे सुंदर खरेच, पण सोपे अज्जिब्बात नाही हो. छाती फ़ुटायची पाळी ; "आपण इकडे का आलो??" ही बारीकशी भावना ; शेवटच्या टप्प्यांत पायच उचलले न जाणे वगैरे जीवावरच्या अडचणी झेलीत माथा गाठावा तर असे पैसा वसूल फ़ोटो भेटतात.
आणि स्वतःबद्दल वाटणारी धन्यता - ती वेगळीच.
पूर्ण अल्बम इकडे आहे -
google photos ~ https://photos.app.goo.gl/P9BsWV8e4GSGidr29
.jpeg)
.jpeg)


.jpeg)


Comments