31 May (1725) - Mata Ahilya Devi's 299th Birthday

३१ मे (१७२५) ... हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इंग्रजी तारखेनुसार २९९ वा जन्मदिवस आहे. तन्निमित्त "महाराष्ट्राचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर" या पुस्तकाची हा छोटीशी ओळख. 
 
 
कट्टर फ़ेमिनिस्ट व पुरूषी अहंकार जोजवणारे - अशा दोन्हींनी हे पुस्तक पूर्ण जागृत प्रज्ञेने वाचावे.  पुण्यश्लोक अहिल्यामाईंचे हे चरित्र एकाच दिवसात वाचून काढले. बहुतांश ओलावलेल्या डोळ्यांनी. 
 
या विजयाबाई जहागिरदारांकरवी आपल्याला ही वाचन भेट मिळावी हेही आपले पूर्वसंचित म्हणावे इतक्या रसाळ, बुद्धिनिष्ठ, तर्कसंगत पण भावपूर्ण पद्धतीने संपूर्ण अभ्यासान्ती त्यांनी ही रचना केली आहे. 
 
अहिल्यामाईच्या आयुष्यात सतत आणि सतत नशिबाशी झगडणेच लिहिले होते. खेदाने म्हणावेसे वाटते की तथाकथित धर्मरूढी आणि पुरुषी वर्चस्ववाद यांच्या बेड्या त्यांच्याही पायी पडल्या अन्यथा त्यांचा चरित्रसूर्य आतापेक्षाही शतपटीने तळपला असता. त्या सूर्यात जरूर त्यासाठी दाहकता होती तर दुःखितांसाठीचा सोनेरी उबदारपणा होता. 
 
नशिबाशी सतत दोन हात होऊनही त्याला दोष न देता त्यांनी एकट्यांनी घेतलेली राजकीय, धार्मिक आणि परोपकाराची झेप आपणां सर्वांसाठी सर्वथा अप्राप्य तरीही आदर्श व अनुकरणीयच आहे. या चरित्राचा आपल्या मनावर संस्कार करवणे हीच एक अनुभूती आहे, ती प्रत्येकाने घ्यावी. त्यांच्या थोरवीबद्दल मी नव्याने काही लिहित बसण्यात अर्थ नाही. एक गोष्ट मनाला जास्त भिडून गेली ती लिहिल्याविना राहवत नाही. 
 
इंदूर - माळव्याला लागून भिल्ल आदीवासींची वस्ती आहे. आजही आहे. हे लोक थेट महाराणा प्रतापाचे आज्ञार्थी. ते इतर कुणाला गिनत नसतात. वाटमारी करणे हा त्यांचा मुख्य धंदा. होळकरांच्या राज्यात इतर सरदारांच्या संगनमताने हा उपद्रव जेव्हा वाढला तेव्हा "भिल्लांचा बंदोबस्त करणाऱ्या शूर वीराचे माझ्या मुलीशी लग्न लावून देईन" अशी त्यांनी घोषणा केली. त्यानंतर दहा वर्षांनी वयवर्षे अठरा असलेल्या आपल्या मुक्ताचे लग्न त्यांनी जातपात न पाहता यशवंत नावाच्या तरूणाशी लावले. मुलीचे इतके वय उलटू देणे हे तत्कालीन समाजासाठी अक्षम्य आक्रीत होते. भिल्ल टोळ्यांचा बंदोबस्त झाला म्हणून त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांना पोशाख देऊन सरकारी नोकरीत घेतले. यानंतर निरंतर भिल्ल समाज आणि माईसाहेब यांत प्रेमादराचे संबंध राहिले. 
 
अहिल्यादेवी मृत्युशय्येवर असताना एक भिल्ल जमाव त्यांना पाहण्यासाठी आला "आम्हांला अहिल्यामाईं वेगळी आई नाही" अशा हट्टाने त्यांचे दर्शन घेतले ... आणि त्यांतल्या एका तरूणाने "माझी वर्षे त्यांना लागू देत" असे म्हणत स्वतःच्या छातीत सुरा खुपसून घेत आत्मसमर्पण केले. या पूर्ण घटनेमधे आजच्या अनुषंगाने फ़ार मोठा सामाजिक संदेश आहे. 
 
ही जीवनकहाणी वाचताना राहून राहून एकाच तेजस्वी महिलेची आठवण येते ती म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब! 🙏🏼
--- 
 
"महाराष्ट्राचे शिल्पकार - तेजस्विनी अहिल्याबाई होळकर" 
लेखिका : विजया जहागीरदार, मध्यप्रदेश
  
फ़ेसबुक पोस्ट ~
पुस्तक महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर ईबुक्स व पीडीएफ़ यां दोन्हीं संस्करणांमधे मोफ़त उपलब्ध आहे. 

Comments

Popular posts from this blog

20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam

20241222 Sun CHUA SUOI DO pagoda with Shivam Desh

20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -