20240902 An's farm Sea Restaurant & Temple Chua Phat Danh Bao Vuong


आज व्हिएतनामच्या हॅप्पी स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्त आमच्या सौ व श्री कान्ह लोकांनी एक छोटेखानी ट्रिप काढवली. ती म्हणजे सौ बिक नोक्‌ कान्ह च्या माहेरच्या fishermen village मधे एका भर समुद्रातल्या लाकडी उपाहारगृहात दुपार घालवणे. 

 

मी, आमचा साहेब सुरेश, सेक्रेटरी युएन, सहकारी कान्ह आणि न्यॅन आणि त्यांची कुटुंबे असा आमचा कबिला होता. 

 

Nhà trên biển - An’s Farm : https://maps.app.goo.gl/XK8Jv6qrXnhQaB6d8 ही जागा एकदम फ़र्मास निघाली. नोक्‌च्या काकांचे हे हाटेल. पहिल्यांदा समुद्र किनारी त्यांच्याच घरात स्कुटरी ठेवल्या, चहापाणी केले. टिपिकल खेड्यातले घर! फ़रशीवरती लोळत पडलेली पोरे. घरातली बाहेरची कामे फ़टाफ़ट लीलया उरकणाऱ्या काटक महिला. घरात हा एवढा पसारा - पण स्वच्छ नेटके छोटे घर. समोरच्या धक्क्यावरून छोट्या होडीने त्यांच्या उपाहारगृहात ते आम्हांला घेऊन गेले. 

 

चारही बाजूंनी समुद्र आणि कोळी लोकांचे सेटप. उघड्या झोपडीला वेढणाऱ्या थंडगार झुळुका. क्या बात है. मी तर तिथल्या हॅमोकचा ताबा घेतला आणि भरपूर आराम केला. 


छोटे - मोठे ऑयस्टर्स, उकडलेला ताजा पापलेट, ताज्या कोलंब्या, स्टर फ़्राय मॉर्निंग ग्लोरी (water spinach), व्हेज फ़्राइड राइस, फ़ळे आणि सरबतासारखी गोड द्राक्षाची वाईन असा साधा पण अतिशय चविष्ट मेनू होता. हे जेवण तिथल्या सेटिंगमुळे आणि पदार्थांच्या ताजेपणामुळे अगदी घासा घासाला अंगी लागत होते. 

 

 

भरपूर जेवण व भरपूर टाइमपास केल्यावर पुन्हा धक्क्यावर आलो आणि मी नुकत्याच (गुगल मॅप्सवर) शोधून काढलेल्या एका बौद्ध मंदीराकडे निघालो. आश्चर्य म्हणजे हे मंदीर नोक्‌च्या बाबांच्या शेताशेजारीच होते. माझ्या घरापासून जवळपास दहा किमीवर. 
Chùa PHẬT ĐẢNH BẢO VƯƠNG : https://maps.app.goo.gl/sEHiFJh5QBTLi8b3A 

 

आज तिथे कसलासा उत्सव होता त्यामुळे भाविकच भाविक. मंदीरात पाहतो तर काय! ... आपले सन्मित्र जर हे मंदीर बघतील तर - "व्हिएतनामच्या बौद्ध धर्मावर मणुवाद्यांचा हल्ला" वेगेरे हैराण आरोळ्या ठोकतील. 

 
 
तिकडे भगवान बुद्धांच्या सोबत तांडवरत ‘शिवा’ आहे, आंबटचिंबट तोंडे करूनी खाली बैसलेल्या आर्जुनाला हलविणारा विश्वरूपदर्शनदाता ‘विष्णू’ आहे, शंख चक्र गदा पद्म धारण केलेली ‘लक्ष्मी’ आहे, कृष्ण बाप्पा आहे, हनुमान बाप्पा आहे, त्रिशूळ धारण केलेला राजपुत्र सिद्धार्थ आहे आणि सगळ्यात कडी म्हणजे आपली तुंदिलतनू घेऊन डान्स करणारा गणपती बाप्पाही आहे! 
 
 

मित्रहो राजकीय / जातीय स्वार्थापायी तुमचे आमचे करणाऱ्यांना काय बोंबलायचे ते बोंबलू द्या. पण भारतीय चिंतन ही आता भारताची soft power आहे. शक्तीशाली होत जाणाऱ्या भारताकडून ती जग मागून घेत आहे. 

 

त्यामधे अग्रक्रमाने बुद्ध महाराज येतात, त्यांचे शांतीचे समतेचे तत्वज्ञान येते आणि मागाहून या सगळ्या देवता येतात, त्यांच्या गोष्टी येतात, कर्मसिद्धांत येतो आणि गीतेची शिकवणही येते - तसेच योग आणि संगीतही. यां सगळ्यांत वैविध्य आहे आणि हेच त्याचे सौंदर्य आहे. त्या वैविध्याला अंतर्विरोध म्हणून धोपटत बसणाऱ्यांच्या प्रेरणा राजकीय / जातीय वा वैयक्तिक आहेत. त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायला शिकूया. समायोजन आणी समन्वय ही नवीन पिढीच्या भारतीयांची प्रेरणा आहे. 

 

परतीच्या वेळी नोक्‌च्या माहेरी बसून दारच्या नारळपाण्याचा आणि मऊमऊ खोबऱ्याचा आस्वाद घेतला. पण ... कुठल्याही समुद्रावर जाऊन कितीही सुंदर सी-फ़ूड वेगेरे खाल्ले तरी आपल्या घरी पोहोचून स्वहस्ते दोन मऊसूत घडीच्या पोळ्या आणि ताजी गरम वांगं बटाटा भाजी चेपल्याशिवाय आपल्याला सुट्टीचा दिवस निभल्याचे पुण्य थोडीच मिळणार आहे? 

 
 
 ... शुभम्‌ भवतु! 
 
#Vietnam_Diary  |  #Hindu_Vietnam 

Comments

Popular posts from this blog

20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam

20241222 Sun CHUA SUOI DO pagoda with Shivam Desh

20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -