20260624 Unfortunate murder of Ketan by fiancé Siya
आणखी एक अतिशय दुर्दैवी प्रकरण - उपवधूने उपवराला ठार केल्याचे. आपल्या माध्यमांचे वार्तांकन अशा प्रकरणात अनावश्यक भडक व सर्वथा अपुरे असते. आताही ते तसेच आहे. आरोपीला बोलते करणे, गुन्ह्याचे खरे कारण पुढे आणणे, त्यावर भडकपणा व मिडिया ट्रायल टाळून साधक चर्चा घडवणे व समाजमनाला विवेक विचार प्रवृत्त करणे हा दृष्टीकोन आपल्या कुरघोडीच्या स्पर्धेत व्यस्त असलेल्या माध्यमांना कधी लाभावा? आताच्या दुर्दैवी प्रकरणातले जोडपे ही शिकलेली सधन मुले होत. त्यांना आधुनिक मूल्यांची पुस्तकी जाण नक्कीच असणार. प्री-वेडिंग शूट करायला सिंहगड आणि खून करायला लोहगड निवडला जातो यावरून त्यांची पढतमूर्खता समजून येते. लग्नासाठीचा नकार आई बापाला - म्हणजेच जात बिरादरीला - म्हणजेच समाजाला उघड करण्यापेक्षा जोडीदाराच्या खुनाचा रस्ता सोपा वाटणे हे आपल्या समाजाच्या खाप-पंचायती सदृश मानसिकतेचे निदर्शक आहे. मुलांची लग्ने ही कौटुंबिक बडेजावाचे प्रदर्शन करण्याची अनिष्टता व तद्मूलक ताण तणाव घेऊन येतात. अमक्या व्यक्तीशी लग्न करायचे नाही - तर तसे स्पष्ट सांगून आपला रस्ता निवडायची अक्कल वा हिं...