20260624 Unfortunate murder of Ketan by fiancé Siya

 

आणखी एक अतिशय दुर्दैवी प्रकरण - उपवधूने उपवराला ठार केल्याचे. आपल्या माध्यमांचे वार्तांकन अशा प्रकरणात अनावश्यक भडक व सर्वथा अपुरे असते. आताही ते तसेच आहे. आरोपीला बोलते करणे, गुन्ह्याचे खरे कारण पुढे आणणे, त्यावर भडकपणा व मिडिया ट्रायल टाळून साधक चर्चा घडवणे व समाजमनाला विवेक विचार प्रवृत्त करणे हा दृष्टीकोन आपल्या कुरघोडीच्या स्पर्धेत व्यस्त असलेल्या माध्यमांना कधी लाभावा? 
  
आताच्या दुर्दैवी प्रकरणातले जोडपे ही शिकलेली सधन मुले होत. त्यांना आधुनिक मूल्यांची पुस्तकी जाण नक्कीच असणार. प्री-वेडिंग शूट करायला सिंहगड आणि खून करायला लोहगड निवडला जातो यावरून त्यांची पढतमूर्खता समजून येते. लग्नासाठीचा नकार आई बापाला - म्हणजेच जात बिरादरीला - म्हणजेच समाजाला उघड करण्यापेक्षा जोडीदाराच्या खुनाचा रस्ता सोपा वाटणे हे आपल्या समाजाच्या खाप-पंचायती सदृश मानसिकतेचे निदर्शक आहे. मुलांची लग्ने ही कौटुंबिक बडेजावाचे प्रदर्शन करण्याची अनिष्टता व तद्मूलक ताण तणाव घेऊन येतात. 
  
अमक्या व्यक्तीशी लग्न करायचे नाही - तर तसे स्पष्ट सांगून आपला रस्ता निवडायची अक्कल वा हिंमत आपल्या मुलां मुलींकडे का नाही? कारण आपल्या समाजाने त्यांना तशी फ़ट ठेवलेली नाही. बहुतांश वेळा गळ्यात पडलेला जोडीदार निभावून नेण्यात आयुष्ये खर्ची पडलेली आहेत. कायद्याने १८ वर्षांवरील व्यक्ती स्वतंत्र आहे. पण समाज वास्तवात तिला स्वतंत्र व्यक्ती म्हणून निर्णय स्वातंत्र्य देण्यास समाज / मायबाप तयार नाहीत. हा एक मुद्दा या प्रकरणात लक्षात घेण्यासारखा आहे. १८ वर्षे वयाचे होईस्तोवर त्यांना आपण शिकवले, पढिक बनवले हे ठीकच ... पण त्यांच्यावर विवेकाचे कोणते संस्कार केले?
 
समाजाने काही तिला खून करायला सांगितले नव्हते! हे खरेच. पण आपल्याकडे खानदान की इज्जत आणि अब्रू या कुचकामी अदृश्य बाहुल्यांच्या पुढ्यात मानवी जीवाची किंमत कमी आहे हे वारंवार दिसून येते. बलात्काऱ्याबद्दल जेवढी घृणा समाजात दिसते तेवढी खुन्यासाठी दिसत नाही. चित्रपटांत दाखवताना प्रेमाच्या चित्रीकरणाची काटछाट पण हिंसाचाराचा भडकपणा मान्य हे प्रशासनाचे धोरणही समाजमनाचा आरसा आहे. ऑनर किलिंगवरील फ़ेसबुकी पोस्टी विंचरून बघता त्यांत त्याच्या समर्थनाच्या शेकडो कमेंट्स मिळतात. आणि लव्ह जिहाद विषयाच्या पोस्टींवर प्रेमविवाहाच्या विरोधाच्या कमेंट्स मिळतात! 
 
आताचे चित्रपट, मालिका यांत बोकाळलेला सेक्सवाद, हिंसेचे समर्थन यांमुळे आपल्या नजराही मेल्या आहेत आणि विवेकही मरतो आहे. आपल्या जीवनात आज सगळे काही आहे. पैसा आहे, विषय उपभोग आहे, देवदेव आहे, स्वातंत्र्य आहे, स्वैरपणा आहे, बऱ्या व वाईट गोष्टींचा अ‍ॅक्सेस आहे - पण विवेक नाही. तो विवेक कुठल्या पुस्तकातून येत नाही. तो कुठे पळून गेला? - तर आपण आध्यात्माकडे पाठ फ़िरवली तेव्हा त्याने काढता पाय घेतला. भारताचा आत्मा आध्यात्म आहे. आध्यात्मिकता हा म्हातारपणाचा विषय नाही, तो पलायनवाद नाही, निवृत्ती नाही - तर विवेक आहे. 
 
आजकाल लहान मुलांना म्युच्यल फ़ंडाची एस आय पी शिकवतात, शेअर गुंतवणूक शिकवतात. तद्वतच प्रत्येक व्यक्तीला लहानपणापासून विश्वकल्याणाच्या प्रेरणेसहित द्वैताकडून अद्वैताकडचा प्रवास सुरू करून देणे गरजेचे आहे. त्या त्या जीवात्म्याची जी काही पातळी असेल त्याप्रमाणे त्याची प्रगती होईल. या विचाराला पुराणमतवादाचे लेबल लावणे सोपे आहे - पण यातून आपली पढतमूर्खता व पढिकक्रूरता यांतून तरी सुटका होईल. 

Comments

Popular posts from this blog

20241215 MySon Bhadreshwara Shiva Temple - Vietnam

20260606 Saturday - 🪷 Chua Kim Son - Nha Trang, Vietnam

20241225 (FB) हिंदुत्वाचे चार प्रकार -