20260604 "Why Dhurandhar?" - Dnyanesh Deshpande
देशभक्ती ही एक कमअस्सल वा मानवता विरोधी भावना आहे असे समजण्याची फ़्याशन सध्या बोकाळली आहे. जगभराचे बाल्कनायझेशन करून जिकडे तिकडे लालभडक हिंसक क्रांत्या करण्याच्या वांत्या करणारे डावे नॅरेटीव्ह बिल्डर्स यामागे आहेत हे स्पष्ट आहे.
नीट विचार करता हे लक्षात येते की मानव विकासाच्या वा मानव मुक्तीच्या चार पायऱ्या कोणत्या - तर "व्यष्टी - समष्टी - सृष्टी - परमेष्टी"!
देशभक्ती / देशसेवा हे समष्टीच्या पायरीवरचे कर्तव्य आहे. ते नीट पार पाडले की मग आपल्याला परमेष्टीच्या / मानवतेच्या गप्पा करण्याची पातळी प्राप्त होते.
हा शुद्ध भारतीय विचार आहे. हा आपल्या रक्तात लहानपणापासून आपोआप पेरला गेला आहे. त्यामुळेच, आयात संकल्पनांचे मळभ दूर होऊन भारतीय मनाच्या मुशीतून घडणाऱ्या कलाकृतींतून तो मांडला जाऊ लागला आहे याचे सहर्ष अप्रूप वाटल्यावाचून राहात नाही.
नेमके हेच या छोट्या लेखात ज्ञानेशने उत्तम प्रकारे दाखवून दिले आहे.
मला धुरंधर का आवडला?
- ज्ञानेश देशपांडे, पुणे
🇮🇳 देशप्रेम: Essential Evil ✖️
🇮🇳 देशप्रेम: Essential Virtue ✔️
हिंदी सिनेमात देशप्रेम, हेरगिरी, सुरक्षा यांची मांडणी अनेकदा एक essential evil म्हणून झाली आहे. म्हणजे — देशासाठी काही कठोर, कधी कधी नैतिकदृष्ट्या धूसर निर्णय घ्यावे लागतात, आणि ते “वाईट असलं तरी आवश्यक” असं दाखवलं जातं.
फॅमिली मॅनमध्येही हीच छटा दिसते. कौंतेयने यावर छान पोस्ट लिहिली होती. देशाची सुरक्षा राखताना नायकाला स्वतःच्या आयुष्याचा, कुटुंबाचा, नैतिकतेचा तडजोडीचा सामना करावा लागतो — आणि त्यातून एक प्रकारची खंत निर्माण होते, असं अनेकदा दाखवलं जातं. राझी सारख्या चित्रपटात तर हेरगिरी ही “कर्तव्य आहे, पण यातून कोणीही सुखी होत नाही” अशी वेदनादायी बाजू दाखवली गेली. मूळ लेखकाला तसं म्हणायचं नसताना!
पण धुरंधर या सिनेमाने हा सगळा दृष्टिकोन उलथून टाकला.
इथे देशप्रेम हे essential evil नाही. इथे देशप्रेम, हेरगिरी, सुरक्षा — या सगळ्या गोष्टी essential virtue म्हणून उभ्या राहतात.
कर्तव्य हे ओझं नाही, तर गौरव आहे.
त्याग हा अपवाद नाही, तर मूल्य आहे.
चित्रपटात व्यक्त केलेलं — “बलिदान परमो धर्म:”
हे फक्त वाक्य नाही, तर संपूर्ण कथानकाचा आत्मा आहे.
धुरंधर सांगतो की देशासाठी केलेला त्याग हा अंधारातून चालत जाणारा प्रवास नाही तर तो प्रकाशाकडे नेणारा मार्ग आहे.
इथे नायक तुटत नाही — तो उंचावतो.
इथे कर्तव्यामुळे आयुष्य कोसळत नाही — ते अर्थपूर्ण होतं. (आठवा - बरेली का पॉकेटमार)
म्हणूनच धुरंधर वेगळा वाटतो. तो देशप्रेमाला अपराधीपणाची छटा देत नाही, तर त्याला सर्वोच्च मूल्य म्हणून प्रतिष्ठा देतो.
धुरंधरचा हा दृष्टिकोन मनाला भिडतो.
देशप्रेम हे ओझं नाही.
देशप्रेम ही भीती नाही.
देशप्रेम ही तडजोड नाही.
देशप्रेम ही एक सर्वोच्च भावना आहे आहे आणि त्यासाठी केलेलं बलिदान हे धर्म आहे.

Comments