20260727 Cockroach Party आंदोलनाचे प्रश्न
प्रश्न गहन आहेत.
"देश सडक से नहीं संसद से चलेगा" हे म्हणणे बरोबर. पण संसदेत / विधिमंडळात / महापालिकेत / पंचायतीत जाण्यासाठी ज्या पद्धतीचे खर्च, कंपूबाजी, राजकारण इ. करावे लागते तिथपर्यन्त सामान्य माणूस पोहोचू शकत नाही हेही सत्य आहे. सरकार / प्रशासनाला प्रश्न विचारण्याची सोय नाही हेही सत्य आहे. बहुदा कळीचा मुद्दा तोच आहे. एकदा निवडून आलो की आपल्याला कुणी प्रश्न विचारू शकत नाही आणि दर पाच वर्षांनी ढोबळमानाने करायचे निवडणूकीतील मतदान भावनिक मुद्द्यांद्वारे, पैसे वाटप करून इ. प्रकारांनी मॅनेज केले की (इव्हीएम वा वोटचोरी नव्हे हे मानले तरी) - पुढची पाच वर्षे आपल्याला कुणी विचारायला येणार नाही ही खात्री या नष्टचर्यात निवडणुकांचे लाभार्थी व जनता गोलगोल फ़िरत आहेत. राजीनामा नाट्य यामुळे आहे.
लोकशाही ही एक त्यातल्या त्यात बरी व्यवस्था आहे इतकेच. ती काही सर्व प्रश्नांवर अंतिम उत्तर नाही. लोकशाहीच्या सगळ्या मर्यादा आपल्या समोर वारंवार उघड्या पडत आहेत. पण शेवटी तीच सगळ्यात बरी - म्हणून तिलाच चालवणे भाग आहे. तिच्या जुन्या मर्यादांवर काही नव्या युगाचे / टेक्नोलॉजीचे उपाय करणे भाग आहे. आजच्या डिजिटल युगात सरकार / प्रशासन / व्यवस्था यांना थेट प्रश्न विचारणे - थेट उत्तर - थेट कारवाई हे शक्य झालेच पाहिजे. बहुमताच्या दादागिरीसमोर ज्या निर्बलांचा आवाज उमटू शकत नाही त्यांचेही हित पाहणे ही लोकशाही प्रणालीत माणूसकीची सर्वोच्च जबाबदारी ठरते. अन्यथा दिल्लीत घडले तसे - असंतोषाच्या भांडवलावर याच प्रकारे बाहेरील शक्ती स्वार होऊन पर्मनंट अराजकतेची तजवीज करीत राहतील.
२०२६ साली NEET पेपरफ़ुटीच्या निमित्ताने डाव्या संघटनांच्या गुंडगिरी सोबत आंदोलन झाले तर सरकार झुकले. पण २०२४ साली याच मुद्द्यावर देशभरात NEET चे विद्यार्थी धरणे देऊन बसले होते त्यांना लाठ्या मारून हाकलवण्यात आले होते. ते आता जेवढे चुकीचे वाटते तेवढेच यावेळच्या आंदोलनाचे खरे रंग समजत असूनही यावर प्रथमपासून का सक्तीची कारवाई झाली नाही तेवढाच हाही प्रश्न शिल्लक राहतो. टुकडे टुकडे गँग, खऱ्या / NEET विद्यार्थांचा अत्यल्प सहभाग, उघड चिथावण्या, विदेशी फ़ंड, जुनेच कल्लाकार, राजकीय वळण हे सर्व समोर दिसत असूनही सरकारकडून संसदेवर चाल करेस्तोवर ढील देण्यात आली. तथापि यावेळचे आंदोलन घरोघरच्या महिलां - मुलां - मुलीं मधे एवढे उचलले का गेले हा प्रामाणिक विचार करण्याचा मुद्दा आहे.
याचा एक अर्थ देशात आजही हिंदुत्वनिष्ठांना अभिप्रेत असे राष्ट्रवादाचे नॅरेटीव्ह व डाव्या अराजकतावाद्यांना अपेक्षित असा सतत संघर्ष यांत निर्णायक निवड झालेली नाही. सामान्य जनता दोहोंकडे केवळ उपयुक्ततावाद म्हणून पहात आहे. रस्त्यावरचे नॅरेटीव्ह डाव्यांकडे आहे. भाजपाचे - खरे तर मोदीचे - मतदार तयार होण्यातच देशाचे भले नाही. हिंदुत्वाची विचारसरणी ‘सर्वेऽपि सुखिनः संतु’ ही देशात रुजली पाहिजे. आपला आदर्शवाद तपासून पाहून त्याच्याशी प्रामाणिक राहणारे लोक हिंसेचे / अराजकतेचे / अंदाधुंदीचे समर्थन करू शकत नाहीत. तथापि CAA, शाहीनबाग, किसान मोर्चा व आता NEET पेपरफ़ुटी हे सर्व आंदोलने सरकारने इतक्या मऊपणे हाताळणे व प्रसंगी माघार घेणे ही संवेदनशीलता मानायची, कमजोरी की त्रुटी हा प्रश्न आहे.
आंदोलनात काय हिडिस प्रकार झाले; ते कसे हायजॅक झाले; कोण लोक घुसले हे आता जगजाहीर आहे. पण काही गोष्टी बेमालूमपणे लपल्या/लपवल्या गेल्या त्यांकडे पाहणे भाग आहे. CJI नी आंदोलनजीवींना कॉक्रोचेस शब्द वापरल्यावर कॉक्रोच जनता पार्टी आली खरी पण त्या असंतोषाचा रोख CJI >> सरकार >> भाजपा असा वळवण्यात आला. तो मुद्दा CJI वर शेकायला हवा होता. पण त्यात टुकडे टुकडे कंपूला रस नव्हता. मुंबईतक सारख्या माध्यमांनी हे टूलकिट बेमालूमपणे चालवले. सरकारवर अविश्वास म्हणून हे आंदोलन झाले म्हणायचे तर हा खरा अविश्वास विरोधी पक्षांवर आहे. ते कुचकामी म्हणून तर ही लढाई रस्त्यावर आली! म्हणजेच प्रचलित व्यवस्था, संसद, संविधान ... सर्वांवर अलगदपणे एक अविश्वास तरूणांमधे रुजवला गेला आहे.
सामान्य हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता या प्रकाराकडे काहीसा दिग्मूढ होऊन पहात आहे. हा त्याच्यासाठी व्यवस्थेबाहेरचा - चौकटीबाहेरचा - syllabus बाहेरचा प्रश्न आहे. भाजपाचा राजकीय विजय म्हणजे एक प्रकारे हिंदुत्व विचारांचा विजय होय - पण तो निर्णायक विजय नव्हे हे अशा प्रकारे लक्षात येते आहे. त्यामुळे आजही हिंदू संघटन, संपर्क, व्यापक हिंदुत्व विचार रोपण हेच काम आणखी चिकाटीने करीत राहणे हाच परवाच्या जंतर मंतर आंदोलनाचा संदेश आहे. लोकांच्या प्रत्यक्ष जगण्याच्या प्रश्नांवर काम सुरू करणे गरजेचे आहे. Course correction चा विचार करायचा तर प्रामाणिक विरोधकांचा सन्मान व अप्रामाणिक खोडसाळांचा तिथल्या तिथे बंदोबस्त हा सद्गुण अंगी बाणवता येतो का अवश्य पहावे. "सर्वेषां अविरोधेन" ही उक्ती तसल्यांसाठी लागू नसावी.
Comments